परभणी - सेलू शहरातील वालूर नाक्यावर घराच्या बांधकामादरम्यान पाया खोदताना मानवी हाडे सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही हाडे बेपत्ता झालेल्या व्यक्तीची असल्याची माहिती रात्री उशिरा पुढे आली. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
वालूर नाक्यावरील राधाबाई काळे यांच्या घरकुलाचे बांधकाम सुरू आहे. घराच्या पायाचे खोदकाम सुरू असताना शुक्रवारी संध्याकाळी मानवी हाडे सापडली. विशेष म्हणजे ही हाडे कापड्यासकट निघाली. माणूस जसे शर्ट घालून झोपतो, तशीच ही हाडे निघाल्याने चर्चेला उधाण आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीपान शेळके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे, डॉ. वैशाली बोधनकर, बिट जमादार संजय साळवे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या हाडांसोबत कपडे देखील निघाले आहेत. ही मानवी हाडे नांदेड येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून तपासणी करण्यात येणार आहे. यानंतरच सत्य परिस्थिती समोर येणार आहे. दरम्यान, या घटनेची पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
ही मानवी हाडे घरात कशी काय पुरली ? ती मृत व्यक्ती कोण आहे ? यासह इतर अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र रात्री उशिरा ही हाडे लक्ष्मण गोमाजी पवार यांची असल्याची माहिती पुढे आली. ते सुमारे 20 ते 21 वर्षापूर्वी बेपता झाले होते. ही त्यांचीच हाडे असून या संदर्भात राधाबाई काळे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तसा संशय व्यक्त केला आहे.