परभणी - लॉकडाऊन मध्ये चढ्या भावाने दारूची विक्री होत असल्याने अनेक दारू माफिया सक्रिय झाले आहेत. अशाच एका दारू माफियाची मालवाहू गाडी आज शनिवारी पहाटे पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पालम शहरात सापळा रचून पकडली आहे. या मालवाहू गाडीची किंमत 2 लाख 50 हजार रुपये असून, त्यामधून 2 लाख रुपयांची विदेशी दारू नेली जात होती. हा सर्व माल जप्त करून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात संचारबंदी देखील लागू असल्याने दारूबंदी करण्यात आली आहे. मात्र काही दारू शौकिन आणि व्यसनाधीन लोकांची गरज पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दारू माफिया सक्रिय झाले आहेत. या परिस्थितीत दारूला चढा भाव मिळत असल्याने रात्रीच्या अंधारात दारूची वाहतूक होत आहे.
या बाबत माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आज शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास पालम शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या श्रीनिवास पेट्रोल पंपासमोर सापळा लावून हा मालवाहू ऑटो पकडला. यावेळी आरोपी विकास मारोती वाघमारे (38 वर्षे, रा.पालम) याला अटक करण्यात आली. तसेच गाडीतील विविध विदेशी कंपनीच्या दारूचे तब्बल 28 बॉक्स ज्याची किंमत 1 लाख 94 हजार 920 रुपये आणि 1 हजार 650 रुपये रोख तसेच 2 लाख 50 हजार रुपयांचा मालवाहू ऑटो असा एकूण 4 लाख 46 हजार 570 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मुद्देमालासह आरोपीतास पालम पोलिस ठाण्यात हजर केले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.