परभणी - दिवाळीच्या तोंडावरच वीज कंपन्यातील सर्वच वीज कामगार, अभियंत्यांसह अधिकारी हे सानुग्रह अनुदानाच्या मागणीसाठी शनिवारपासून संपावर जाणार असल्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. तर याच मागणीसाठी आज (गुरुवार) परभणीच्या वीज महावितरण कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. दिव्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीतच वीज कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. परभणी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजेच 600 वीज कामगार या संपात सहभागी होणार असून मागण्या मान्य होईपर्यंत कामावर रुजू होणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.
'ऑनलाईन बैठकीत झाला निर्णय'
राज्याचे प्रधान उर्जा सचिव असिम गुप्ता यांच्यासह तिन्ही कंपनींचे व्यवस्थापकीय संचालकांसमवेत कामगार संघटनांची आज (गुरुवारी) तिन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठक झाली. यात बोनस व सानुग्रह अनुदान देता येणार नाही, अशी भूमिका गुप्ता यांच्यासह व्यवस्थापकीय संचालकांनी घेतल्याने संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला.
'आंदोलन 27 संघटनांचा सहभाग'
तिन्ही वीज कंपन्यातील कामगार, अभियंते आणि अधिकारी सतत वीज कंपन्यांच्या प्रगतीकरिता प्रयत्न करत असतात. कोविड-१९ च्या महामारीसह निसर्ग वादळ व महापुरात जोखीम पत्करुन राज्यातील सर्वच वीज कामगार, अभियंते, अधिकाऱ्यांनी जीवाची परवान न करता काम केलेले आहे. त्यामुळेच दरवर्षी प्रमाणे या वर्षीही सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी सर्वच सघंटनानी 5 नोव्हेंबर रोजीच ऊर्जा मंत्र्यांसह उर्जासचिव, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांकडे केली होती. महानिर्मिती, महापारेषण व महावितरण कंपन्या, वीज कंपनीतील कार्यरत कामगार, अभिंयते, अधिकारी यांच्या २७ सघंटनानी पत्र देऊन सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केलेली आहे.
सरकार व तिन्ही कंपन्याचे व्यवस्थापन बोनस सानुग्रह अनुदान देण्यासाठी टाळाटाळ करत असल्यामुळे येत्या शनिवारी (दि.14) सकाळी ८ वाजल्यापासून या सर्व 27 संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला.
'परभणीच्या कार्यालयाबाहेर निदर्शने'
दरम्यान, याच मागणीसाठी आज (गुरुवार) पासून सर्वत्र निदर्शने करण्यात येत आहेत. त्यानुसार येथील जिंतूर रस्त्यावरील वीज महावितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसीट वर्कर्स फेडरेशनेचे मंडळ अध्यक्ष पंकज पतंगे, सचिव किशोर गायकवाड, तांत्रिक कामगार संघटनेचे नाना चट्टे, क्षेत्र तांत्रिक संघटनेचे गोविंद शहाणे यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनीच्या सचिवांसह, संचालक मंडळांनी घेतलेल्या हटवादी भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध करत निदर्शने करण्यात आली.