परभणी - जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर सर्वत्र पाऊस पडला. बुधवारी दिवसभर वातावरणात उष्णता असल्याने पावसाची शक्यता वर्तवली जात होती. रात्रभर रिमझिम पडलेल्या पावसामुळे वातावरणातील थंडी बऱ्याच अंशी ओसारली आहे.
परभणी जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून तापमानाचा पारा गेल्या 15 वर्षांमध्ये सर्वात खाली आला आहे. परंतु, काल दिवसभर तापमानात अचानक वाढ झालेली पाहायला मिळाली. कमाल तापमान 31 अंशावर तर किमान तापमान 19 अंशांवर पोहोचले होते. बुधवारी मध्यरात्रीनंतर संपूर्ण जिल्ह्यात पाऊस पडल्यामुळे रात्रीतून थंडी गायब झाली आहे.
हेही वाचा - जळगावात अवकाळी पाऊस; रब्बीच्या पिकांना फटका
ढगाळ वातावरण असल्याने उकाडा वाढला आहे. याचा फटका रब्बीच्या पिकांना बसण्याची शक्यता आहे. गव्हाची पेरणी झालेली असून उगवत्या गव्हाला थंडीची आवश्यकता आहे. मात्र, अवेळी पडलेला पाऊस गहू पीकाला मारक ठरू शकतो. वातावरणही दूषित होण्याची शक्यता असल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.