परभणी - तब्बत आठ दिवसांपासून अंधारात चाचपडणाऱ्या गावातील विजेचे रोहित्र जळून खाक झाले आहे. पूर्णा तालुक्यात असलेल्या पांगरा ढोणे गावात ही घटना घडली आहे. यामुळे या गावावर आणखी काही दिवस अंधारात राहण्याची वेळ आली आहे. याबद्दल गावकऱ्यांनी महावितरण कंपनीविरोधात संताप व्यक्त केला आहे.
पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोने गावचा विद्युत पुरवठा गेल्या 8 दिवसांपासून खंडित झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. वीज नसल्याने विद्यार्थी तसेच वृध्द आणि महिलांना कसरत करावी लागत आहे. त्यातच रॉकेल मिळत नसल्याने गोड्या तेलाचे दिवे लावून रात्र काढावी लागत आहे. पिठाची गिरणी देखील बंद पडली आहे. अशा परिस्थितीत गावातील गावठानाला असलेले महावितरणचे रोहित्र मध्यरात्री अचानक पेट घेऊन जळून खाक झाले. त्यामुळे गावामध्ये मध्यरात्री एकच घबराट निर्माण झाली. तर या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. महावितरण कंपनीने याकडे लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा - ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: महामार्गावर चालणारे मातीचे टिप्पर तत्काळ बंद