परभणी - राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण समिती अंतर्गत चालणाऱ्या जिल्हा हिवताप कार्यालयाला जिल्हा परिषदेअंतर्गत हस्तांतरण करण्याचा निर्णय प्रशासकीय विभागाने घेतला आहे. राष्ट्रपती राजवट असताना या संदर्भातील परिपत्रक काढण्यात आले. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये अन्यायाची भावना असून या विरोधात संघर्ष समितीने आज निदर्शने करत परिपत्रकाची होळी केली आहे.
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्याक्रमाचे तसेच प्रशासकीय कामकाजाचे सनियंत्रण जिल्हा परिषदेकडे सोपविण्याबाबत शासनाने आदेश केले आहे. विशेष म्हणजे, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आसतानाच किरकोळ कारणे सांगत राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्याक्रमातील जिल्हा हिवताप कार्यालय कामकाजात अडथळे निर्माण करण्याचे काम प्रशासनाने चालविले आहे. असा आरोप अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत.
तसेच कामकाजात सुसूत्रीपणा आणण्याच्या बहाण्याने प्रशासकीय कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्या नियमित कामकाज व जबाबदाऱ्या निभावण्यात अडचणी आणणारे हे परिपत्रक २२ नोव्हेंबर रोजी काढून संपूर्ण विभागच जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा घाट घातला जात आहे, अशी तक्रार या समितीने केली आहे. त्या अनुषंगाने परभणी जिल्हातील सर्व संवर्गातील कर्मचारी तसेच सर्व संघटनांचे पदाधीकारी यांनी एकत्र येऊन आज या बाबीचा कडाडून विरोध केला. तसेच, परिपत्रकाची अंमलबजावणी रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारादेखील यावेळी देण्यात आला.
हेही वाचा- परभणीत शाळा वाहन चालकांचा बंद; आरटीओ विरोधात पुकारले आंदोलन