परभणी - लोकसभा मतदार संघातील उमेदवार संजय जाधव यांनी पाच दैनिकांना पेड न्यूज दिल्याबद्दल त्यांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी. शिवाशंकर यांनी नोटीस बजावली आहे. या बातम्यांची जाहिरात म्हणून होणारी किंमत जाधव यांच्या खर्चातदेखील समाविष्ट करण्यात आल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक कालावधीत विविध माध्यमातील बातमी व राजकीय जाहिरातींचे मॉनिटरींग निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय एमसीएमसीकडून केले जात आहे. 3 एप्रिलला ५ दैनिक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या समसमान मजकुराच्या 5 बातम्या माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीने प्रथमदर्शनी निकषानुसार पेडन्यूज असल्याचा निष्कर्ष काढला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवार संजय जाधव यांना नोटीस देवून या बातम्या पेडन्यूज असून त्याचा खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात का समाविष्ट करू नये, याबाबत 48 तासात खुलासा सादर करण्याबाबत कळविले होते.
याविषयी त्यांच्याकडून विहित कालावधीत काहीही खुलासा प्राप्त न झाल्याने समितीने या 5 वृत्तपत्रातील 5 बातम्या पेडन्यूज असल्याचा निर्णय अंतिम केला आहे. विशेष म्हणजे संबंधित खर्च जाहिरात दराप्रमाणे निवडणूक खर्चात समाविष्ट करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीकडून मुद्रित माध्यमाबरोबरच इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियावरील बातम्या व जाहिरातीवरही कडक नजर ठेवण्यात येत आहे. आवश्यक त्या परवानगी शिवाय कोणत्याही प्रकारची जाहिरात इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करू नये. याबाबत एका पत्राद्वारे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व उमेदवारांना यापूर्वीच कळविल्याची माहिती परभणीच्या निवडणूक विभागाने दिली आहे.