परभणी - गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेला परतीचा पाऊस 300 टक्क्यांहून अधिक बरसला आहे. दरम्यान, नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत.
परभणी जिल्ह्यात पावसाची सरासरी 774.19 मिमी एवढी आहे. गेल्या चार वर्षात पावसाने ही सरासरी गाठली नव्हती. मात्र यावेळी भर पावसाळ्यात खंड देणारा पाऊस परतीच्या दिवसांमध्ये जोरदार बॅटिंग करून आपला कोटा पूर्ण करत आहे. जिल्ह्यात 1 जूनपासून आजपर्यंत 101 टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या धुवांधार पावसामध्ये पाथरी, सेलू, मानवत आणि पालम या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी नोंदवण्यात आली आहे. तसेच इतर तालुक्यांमध्येदेखील मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील परभणी आणि जिंतूर वगळता सर्वच तालुक्यात शंभर ते सव्वाशे टक्के पाऊस झाला आहे. मात्र परभणीत केवळ 72 टक्के तर जिंतूरात 76 टक्के पाऊस पडला आहे. यामुळे या दोन्ही तालुक्यात पाण्याची परिस्थिती असमाधानकारक आहे.
दरम्यान, पालम, पूर्णा, गंगाखेड, पाथरी या तालुक्यात जवळपास सव्वाशे टक्के पाऊस पडल्याने नदी, नाले, ओढे, धरणं आणि विहिरींची पाणीपातळी वाढली आहे. अनेक विहीरी काठोकाठ भरल्या असून धरण ओवरफ्लो झाली आहेत. पाथरीतील मुदगल आणि ढालेगावचा बंधारा तुडुंब भरला असून दोन्ही बंधाऱ्यातून पात्रात पाणी सोडले जात आहे. तसेच परभणी शहराची तहान भागवणारे येलदरी धरण देखील 31 टक्के भरले आहे. गेल्या महिन्यातच या धरणात केवळ 11 टक्के पाणीसाठा होता.
हेही वाचा - परभणी जिल्ह्यात परतीच्या पावसाची जोरदार बॅटिंग; तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, पिकांचे मोठे नुकसान
या पावसामुळे पाण्याचे स्त्रोत भरत असले तरी पिकांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. विशेषतः कापसाला कोंब फुटले असून सोयाबीन पिकाला अक्षरशा बुरशी येऊ लागली आहे, तर वांगे, दोडके, भेंडी, गवार, टमाटे, मिरची अशा भाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. फळबागाही प्रभावीत झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी, या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी प्रशासनाला केली आहे. यासंदर्भात अनेक राजकीय पक्षांकडून देखील निवेदनं दिली जात आहेत.