परभणी - आत्तापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या परभणी जिल्हात एकाला कोरोनाची लागण झाली आहे. सुरुवातीपासून ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या परभणीत आज अचानक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे आज (गुरुवार) मध्यरात्री १२ वाजल्यापासून पुढील ३ दिवस परभणी शहरात कलम 144 अंतर्गत संचारबंदी (कर्फ्यु) लागू करण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता कुठलीही व्यक्ती किंवा वाहने रस्त्यावर दिसता कामा नयेत, असे कडक आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. रस्त्यावर दिसल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज सायंकाळी ५ वाजता सदर आदेश बजावले आहेत. ज्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चे कलम 144नुसार परभणी शहर महापालिका हद्दीमध्ये तसेच हद्दीबाहेरील तीन किलोमीटरच्या परिसरात मध्यरात्री १२ वाजल्यापासून म्हणजेच 17 ते 19 एप्रिलच्या रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
या संचारबंदीतून शासकीय कार्यालयांची वाहने तसेच शासकीय आणि खासगी दवाखाने तसेच औषधांची दुकाने, शासकीय निवारा, बेघर आणि गरजूंना अन्न वाटप करणाऱ्या सेवाभावी संस्थांची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेली वाहने आणि व्यक्ती याशिवाय वैद्यकीय, आपत्कालीन, अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या व्यक्ती व वाहनांसह शासकीय दूध संकलन करणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. मात्र, त्याशिवाय इतर कुठलीही व्यक्ती वाहने रस्त्यावर बाजारामध्ये गल्ल्यांमध्ये किंवा घराबाहेर आढळून आल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 भारतीय दंड संहिता 860चे कलम 188नुसार कारवाई करण्यात येणार आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलीस अधीक्षक, आयुक्त महापालिका, उपविभागीय दंडाधिकारी, सहाय्यक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन तसेच परभणीच्या तहसीलदारांवर सोपवण्यात आली आहे.
या आदेशामुळे आता परभणीत पुढील ३ दिवस कुठलेही खोटे कारण देऊन तसेच अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली फिरणाऱ्यांवर आळा बसणार आहे. मात्र, पोलिसांनी देखील कठोर भूमिका घेऊन या काळात आदर्श संचारबंदी अंमलात आणावी, अशी अपेक्षा सूज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.