परभणी- साईबाबांचा जन्म कुठे झाला ? या मुद्द्यावरून पाथरी आणि शिर्डीवासीयांमध्ये निर्माण झालेल्या वादात शिर्डीकरांनी आजपासून बंदची हाक दिली आहे. त्यांच्या या कृतीला जशास तसे उत्तर म्हणून पाथरीकरांनी देखील सोमवारी बंद पाळण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, हा निर्णय व्यापाऱ्यांसोबत शनिवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर मागे घेण्यात आला आहे.
दरम्यान, पाथरीतील सोमवारचा बंद रद्द करण्यात आला असून, मंगळवारी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पुढारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साईबाबा मंदिरात महाआरती होणार आहे. त्याचबरोबर, महाबैठकीचे देखील आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंदिर कृती समितीचे अध्यक्ष तथा आमदार बाबजानी दुर्रानी यांनी दिली आहे. सोमवारी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी आणि पाथरी येथील संबंधित लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना मुंबईत बैठकीसाठी पाचारण केले आहे. शिवाय, परभणी जिल्हा परिषदेच्या सभापतींची निवड प्रक्रिया होणार आहे. व्यापाऱ्यांनी हा बंद पाळू नये, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली होती.
दरम्यान, दूरवरून साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून हा बंद रद्द करण्यात आल्याचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी सांगितले आहे. मात्र, याबाबत पाथरी येथील साई मंदिरात सर्व पक्षीय नेते, लोकप्रतिनिधी व संबंधित पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत ठोस भूमिका घेऊन पुढची कृती ठरविणार असल्याचे देखील आमदार दुर्रानी यांनी सांगितले आहे.
हेही वाचा- 'पाथरीतील 150 वर्षापूर्वीचे लिंबाचे झाड हे साईबाबांचे निशाण'