परभणी - अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे अंतर्गत परभणी शाखेच्या वतीने तालुक्यातील धर्मापुरी येथे मंगळवारी विभागीय बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन कवी प्रा. इंद्रजित भालेराव व बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या सानेगुरुजी साहित्य नगरी येथील बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे व्यासपीठावर हे संमेलन पार पडले. व्यासपीठावर केंद्रीय कार्यकारणी कार्यवाह मुकुंद तेलीचेरी, प्रा. केशव बा. वसेकर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रशांत गौतम, शिवसांब सोनटक्के, प्रा.किरण सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, प्रा.दीनानाथ फुलवाडकर, स्वागताध्यक्ष शीतल सोनटक्के, डॉ.आनंद देशपांडे, नितीन फुटाणे यांची उपस्थिती होती.
यावेळी एकनाथ आव्हाड म्हणाले की, लहान मुलांना खूप प्रश्न पडतात. मुलांच्या प्रश्नांचे उत्तर देणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी पुस्तकांंशी मैत्री करावी. आव्हाड यांनी संमेलना प्रसंगी काही बाल कविता देखील सादर केल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कवितांना मोठा प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात विभागीय बालकुमार साहित्य संमेलनाची स्मरणिका तसेच शितल सोनटक्के लिखित 'त्यांच जग तिचं जग' व एकनाथ आव्हाड लिखित 'मिसाईल मॅन' या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनासाठी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील बालक व शिक्षकांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी चित्रकार प्रज्वल ठाकर, आकांक्षा गरड व शिंदे या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते.
'श्यामची आई' पालकांसाठीच !
संमेलनाचे उद्घाटक कवी इंद्रजित भालेराव बोलताना म्हणाले की, लहान मुलांसाठी लिहिणे सोपे नाही. साने गुरुजींनी लहान मुलांसाठी व मोठ्यांसाठीसुद्धा लेखन केले. 'श्यामची आई' हे पुस्तक आपण मुलांसाठी आवश्यक आहे, असे म्हणतो. परंतु, खऱ्या अर्थाने श्यामची आई पुस्तक पालकांसाठीच आवश्यक आहे. बालसाहित्याला जुनी परंपरा असून पहिले बालसाहित्य म्हणजे आईचे अंगाई गीत असल्याचे त्यांनी सांगितले.