परभणी - ग्रीन झोनमध्ये असलेल्या परभणी जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक खळबळजनक बातमी समोर आली. जिंतूर तालुक्यातील दोन मुले आणि त्यांची आई असे तिघेजण कोरोनाबाधित असल्याचे रात्री 11 वाजता निष्पन्न झाले आहे. मुंबईच्या पोलीस खात्यात कामाला असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील हे तिघेजण असून तीन दिवसांपूर्वी ते मुंबईतून जिंतूरातील शेवडी या आपल्या मूळ गावी आले होते.
लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर सुमारे 25 दिवस ग्रीन झोनमध्ये असलेल्या परभणी जिल्ह्यात 16 एप्रिलला पुण्यातून हिंगोलीकडे जाणारा तरुण परभणीत मेव्हण्याकडे आला असता, त्याची तपासणी करण्यात आली. त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सुमारे दीड महिन्याच्या कालावधीनंतर सेलू येथील एक कॅन्सरग्रस्त महिला नांदेड येथे उपचारादरम्यान पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, प्रत्यक्षात परभणीत असलेल्या एकमेव रुग्णामुळे परभणी जिल्हा काही काळासाठी ऑरेंज झोनमध्ये गेला होता. मात्र, त्यानंतर आत्तापर्यंत परभणी ग्रीन झोनमध्ये राहिला. परंतु, गुरुवारी रात्री पुन्हा एकदा परभणी जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेला आहे.
मुंबई येथे पोलीस खात्यात काम करणाऱ्या एका व्यक्तीने मुंबईत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने आपल्या कुटुंबाला तीन दिवसांपूर्वी जिंतूर तालुक्यातील येलदरीजवळ असलेल्या शेवडी या गावी आणून सोडले होते. 12 मे रोजी त्यांची येलदरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली. संशय आल्याने त्यांचा स्वॅब तपासणीसाठी नांदेड येथे पाठविण्यात आला होता. त्याचा रिपोर्ट गुरुवारी रात्री सव्वाअकरा वाजता जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला आहे. ज्यामध्ये सदर पोलिसाची चाळीस वर्षीय पत्नी आणि दहा वर्षाच्या आतील दोन मुले कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना जिंतूर येथून रात्री 11.30 वाजता परभणीच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेतून पाठविण्यात आल्याची माहिती जिंतूरचे आरोग्य अधिकारी डॉ.रविकिरण सांडगे यांनी दिली. तर रात्री 11.15 वाजता 3 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.