परभणी - येथील जिल्हा तथा निवडणूक प्रशासनाने निवडणुकीच्या कामात हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. या अंतर्गत गेल्या काही दिवसांमध्ये अधिकाऱ्यांना नोटीस दिल्याचे प्रकार घडले आहेत. परंतु, आता 196 कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रशिक्षणालाच दांडी मारली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई सुरू केली. यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा- बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केलेली 'लुंगी' नेसून आदित्यचा वरळीत प्रचार
परभणी जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदार संघात निवडणूक घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर काल (सोमवारी) विधानसभा निहाय कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, या कार्यक्रमात तब्बल 196 कर्मचारी गैरहजर राहीले. ज्यामध्ये जिंतुर विधानसभा मतदार संघात 53 कर्मचारी गैरहजर होते. तर परभणीत 20, गंगाखेडमध्ये 62 आणि पाथरी विधानसभा मतदारसंघात 61 मतदान कर्मचारी प्रशिक्षणाला गैरहजर राहीले. या गैरहजर कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सदर कर्मचारी यांचे खुलासे प्राप्त झाल्यानंतर ज्या कर्मचारी यांचा खूलासा संयुक्तीक ठरणार नाही, अशा कर्मचाऱ्यांविरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, गैरहजर कर्मचाऱ्यांनी त्यांची नियुक्ती ज्या विधानसभा मतदार संघामध्ये करण्यात आली आहे, त्या विधानसभा मतदार संघाच्या निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे तात्काळ रुजू व्हावे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे.