पालघर - जिल्ह्यात मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, खासदार आणि मच्छिमार संस्थांची भेट घेतली आहे.
विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्याकरिता 100 एकर जागेची आवश्यकता आहे. उपकेंद्र हे जिल्हा मुख्यालयापासून जवळ सोयीच्या ठिकाणी उभारण्यासाठी संबधीत तांत्रिक बाबींची कुलगुरूंनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे.
यासाठी दोन ठिकाणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्यांनी पाहणी केली. मुंबई विद्यापीठाच्या कार्यालयीन इमारतीसाठी प्राथमिक तत्वावर पालघर मध्ये किमान 5 एकर जागा अपेक्षित असून हे प्रशासकीय कार्यालय लवकरात लवकर स्थापन व्हावे, अशी इच्छा कुलगुरूंनी जिल्हाधिकारी आणि खासदारांना समोर व्यक्त केली आहे.
राज्याला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्या अनुशंगाने मत्स्य व्यवसायाच्या दृष्टीने नवीन अभ्यासक्रम सुरू करून नवीन पिढी तयार करण्याची गरज आहे. म्हणून पालघर येथे 'अक्वा कल्चर सेंटर' लवकरात लवकर सुरू करण्याचा विचार असल्याचेही माहिती कुलगुरुंनी दिली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिंधु स्वाध्याय या उपक्रमांतर्गत सातपाटी येथे मत्स्यव्यवसायाशी संबंधित अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार आहे. यासाठी सातपाटी येथील सर्वोदय सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाशी चर्चा केली. यावेळी या संस्थेने विद्यापीठाचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर यांनी सांगितले आहे.
पालघर आणि आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांना दररोज मुंबईमध्ये येऊन शिक्षण घेणे व नियमित मुंबई विद्यापीठाशी संपर्क साधणे अवघड जाते. त्याचप्रमाणे पालघर जिल्हा हा आदिवासी दुर्गम भाग असून इथल्या मुलांना उपयुक्त ठरतील असे नवीन अभ्यासक्रम या उपकेंद्राच्या माध्यमातून सुरू करण्याचा मुंबई विद्यापीठाचा मानस आहे.
आपल्या देशात अजूनही मत्स्यव्यवसाय पारंपरिक पद्धतीने सुरू आहे. संपूर्ण जगभर नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्यव्यवसायात अनेक देशांनी प्रगती केलेली आहे. अशा दृष्टीने काही मत्स्यव्यवसायाशी निगडित शिक्षण सर्टिफिकेट, डिप्लोमा तसेच पदवी आभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सांगितले आहे.
पालघरचे जिल्हाधिकारी, खासदार व मच्छिमार संस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून मुंबई विद्यापीठाला आवश्यक जागा मिळेल आणि मुबई विद्यापीठाचे एक सुंदर उपकेंद्र लवकरात लवकर सुरू होईल, असा विश्वास मुबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.