पालघर Powerlifting Competition : जिल्ह्यातील विभा रावते आणि रिया पिंपळे या दोन महिलांनी राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पालघरचं नाव देशभर गाजवलं. या महिलांना पॉवर लिफ्टींगमध्ये सुवर्णपदके मिळाली आहेत. छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून राज्याचं नाव त्यांनी उंचावलं आहे. राष्ट्रीय पातळीवरची सुवर्णपदके पटकावून रावते आणि पिंपळे पालघरला आल्यानंतर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
जास्त वजन उचलून रोवला यशाचा झेंडा : पॉवर लिफ्टिंग स्पर्धा अत्यंत कठीण असते. थोड्याशा फरकाने विजेतेपद हुलकावणी देत असतं. या पार्श्वभूमीवर विभा आणि रिया या दोन महिलांनी गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि नंतर राष्ट्रीय पातळीवरील सर्व स्पर्धा जास्तीत जास्त वजन उचलून यशाचा झेंडा उंचावत नेला. रायपूर येथे पश्चिम क्षेत्रात ही चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली.
आदिवासी गृहिणीची कमाल : विभा रावते या आदिवासी समाजातील आहेत. पालघर तालुक्यातील कोकनेर येथील वामन पाटील यांच्या त्या कन्या आहेत. तर पालघर मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे कुणाल रावते यांच्या पत्नी आहेत. त्यांनी मिळवलेलं यश उत्तुंग असं आहे. ५६ ते ६४ किलो वजन गटात त्यांनी सुवर्णपदक मिळवले. त्यांना या कठीण स्पर्धेसाठी पतीचं सहकार्य लाभलं. त्या दररोज पहाटे कल्याण येथे जाऊन तेथील व्यायाम शाळेत पॉवर लिफ्टिंगचा सराव करत होत्या. पहाटे उठून जायचं आणि दिवसभर सराव करून परत यायचं हा त्यांचा दिनक्रम होता. त्यांना कल्याण येथील प्रशिक्षक भास्कर गोराई यांचं मार्गदर्शन लाभलं. पतीच्या यशात जसा पत्नीचा वाटा असतो, तसाच एका महिलेच्या पाठीमागे पती खंबीरपणे उभा राहिला तर ती काय करू शकते, हे विभा यांच्या राष्ट्रीय पातळीवरील यशानं अधोरेखित केलंय.
पती निधनानंतर सावरून यशाला गवसणी : रिया पिंपळे या पतीच्या निधनानंतर हार न मानता उमेदीने उभे राहिल्या. अवघ्या २५ व्या वर्षी त्यांना वैधव्य आलं. त्यानंतर त्यांनी पॉवर लिफ्टिंगमध्ये झोकून दिलं. त्यांचा दिनक्रमही अतिशय व्यग्र असा होता. पहाटे साडेचार ते रात्री साडेनऊ अशा वेळात नोकरी करायची, त्यासाठी प्रवास करायचा. लोक सुट्टीच्या दिवशी विश्रांती घेतात, फिरायला जातात. परंतु रिया यांनी मात्र सरावावर लक्ष केंद्रित केलं. महिला काहीही करू शकतात. त्यांना फक्त संधी मिळायला हवी असं त्या सांगतात. पॉवर लिफ्टिंगमध्ये मेहनत असते. त्यासाठी खर्चही भरपूर येतो. आहारावर नियंत्रण ठेवावं लागतं. ठराविक आहार घ्यावा लागतो. असं असतानाही सर्व बंधने पाळून, घर सांभाळून नोकरी करत रिया यांनी मिळवलेलं यश हेच स्पृहणीय आहे. केवळ देशासाठी आणि आनंदासाठी खेळतो, असं त्या नम्रपणे सांगतात.
हेही वाचा -
- भारतीय खेळाडूंची आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी, एक नजर या अप्रतिम प्रवासावर
- Deadlift Powerlifting Competition : वयाच्या 78 व्या वर्षी जिंकली डेडलिफ्ट पॉवर लिफ्टिंग स्पर्धा; 50 किलो वजन उचलले
- World Archery Championship: भारताचा 'सुवर्ण' नेम; साताऱ्याची लेक अदिती 17 व्या वर्षीच बनली जागतिक चॅम्पियन, पंतप्रधानांकडून कौतुक