पालघर (वाडा)- ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नव्या पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. तरी अद्याप जुन्या शासकीय कामकाजाची माहिती मिळविण्यासाठी आणि कामे करून घेण्यासाठी नागरिकांना ठाणे जिल्ह्याकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्हा तयार झाला आणि काही कार्यालयांच्या कामकाजाचा कार्यभार येथे हाकू लागला. पण जुन्या आरटीओ पासिंग वाहनचालकांना अजुनही ठाणे येथील आरटीओ कार्यालयात धाव घ्यावी लागत आहे. त्यानंतर वाहनचालकांना पुन्हा जिल्ह्यातील वसई आरटीओ कार्यालयाकडून कामे करून घ्यावी लागत आहे. यात वाहन मालकाचा वेळ, पैसा वाया जात आहे. तसेच त्यांना त्रासही होता आहे. त्यामुळे ठाणे कार्यालयाने जुन्या वाहनांची माहिती वसई कार्यालयाकडे वर्ग करावी अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.
याबाबत पालघर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नंदकुमार पाटील यांनी ठाणे आरटीओकडून जुन्या वाहनांची माहिती वसई आरटीओ कार्यालयाकडे वर्ग करा असा प्रश्न, नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित केला आहे. तसेच याबाबत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे पत्रव्यवहार करून मागणी केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.