पालघर - जिल्हापरिषद शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शाळा परिसरात सडा टाकून रांगोळी काढून सुशोभीकरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. शाळेत विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच उत्साह दिसून आला.
जिल्हापरिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती निलेश गांधी यांनी जिल्हापरिषद शाळा वाडा येथे बैलगाडीतून पुस्तकांची दिंडी काढली. या दिंडीत विद्यार्थ्यांसह पालकांनी सहभागी होत प्रवेशोत्सव साजरा केला. जिल्हापरिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे यांनी आपल्या बोर्डी गटात जांबुपाडा जिल्हापरिषद शाळेत विद्यार्थ्यांसह प्रवेशोत्सव साजरा केला.
विविध तालुक्यांमधील जिल्हापरिषद पदाधिकारी, पंचायत समिती पदाधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गटांतील जिल्हापरिषद शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा केला. यावेळी जिल्हापरिषदेमध्ये आलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे अनोख्या स्वरूपाने स्वागत करण्यात आले.