पालघर - पालघर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या ८ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपला मोठा फटका बसला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही या निवडणुकीत मोठे यश मिळविले असून तो दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
जिल्हा परिषदेच्या ५७ तर ८ पंचायत समित्यांच्या ११४ जागांसाठी निवडणूक झाली होती. मात्र, जिल्हा परिषदेच्या ५७ जागांपैकी शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळवण्यात यश आले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ५७ पैकी शिवसेनेला १८, राष्ट्रवादी काँग्रेसला १५, भाजपला १०, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षला ६ , बहुजन विकास आघाडीला ४, अपक्ष ३ तर काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
पालघर जिल्हा परिषदेच्या एकूण ५७ जागांपैकी बहुमतासाठी २९ जागांची गरज असली तरी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे, पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडी सत्तेत येणार असल्याचे चित्र आहे. मागील वेळेस सेना-भाजप युती आणि बहुजन विकास आघाडी, अशा तिघांकडे पालघर जिल्हा परिषदेची सत्ता होती. मात्र, यावेळेस झालेल्या राज्यातील सत्ता बदलामुळे पालघर जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडी होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीत भाजपला मागे टाकण्यात सेना राष्ट्रवादीला यश
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला मागे टाकण्यात सेना राष्ट्रवादीला यश आले आहे. जिल्हा परिषदेसह झालेल्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीत मोखाडा आणि पालघर या पंचायत समित्या शिवसेनेकडे, तालासरी पंचायत समिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे, जव्हार पंचायत समिती भाजपकडे, विक्रमगड पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उर्वरित डहाणू, वाडा आणि वसई या तीनही पंचायत समित्यांवर महाविकास आघाडीला संमिश्र यश आले आहे.
हेही वाचा- पालघर जिल्हा परिषद निवडणूक : राष्ट्रवादी ५, तर माकप ४ जागांवर विजयी