पालघर- राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सत्ता स्थापनेसाठी सकारात्मक चर्चा होऊन तिघांची एकत्रीत सरकार स्थापन होईल, अशी स्थिती होती. मात्र, आज सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाने धक्कादायक वळण घेतले. अनपेक्षितरित्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांचा पाठींबा घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. देवेंद्र फडणवीस यांनी सकाळीच मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपचा निषेध केला आहे.
शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, असे चित्र असताना राजकारणाला मिळालेल्या कलाटणीमुळे शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. पालघर येथील हुतात्मा चौक परिसरात शिवसैनिकांनी रॅली काढून भाजपविरोधी घोषणा देत भाजपचा निषेध केला. देवेंद्र फडणवीस यांना लपून-छपून शपथ घेण्याची गरज का पडली? असा सवाल यावेळी शिवसैनिकांनी उपस्थित केला. तसेच भाजपने लोकशाहीचा गळा घोटला असून हा लोकशाहीसाठी काळा दिवस आहे, असे म्हणत जनता पक्षाचा निषेध केला.
हेही वाचा- पालघरमध्ये गाडी भाड्याने मागवून चालकाला लुटणारे २ दरोडेखोर जेरबंद