पालघर/नालासोपारा - बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या नालासोपारा विधानसभा क्षेत्राला खिंडार पाडण्याची तयारी शिवसेनेने केल्याचे दिसत आहे. त्यासाठी त्यांनी एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. शर्मा यांचा पोलीस अधिकारी पदाचा राजीनामा अजून मंजूर झाला नसला, तरीही त्यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत.
एन्काउंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना आता निवडणुकीचे वेध लागले आहेत. नालासोपाऱ्यात प्रदीप शर्मांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केल्याचे दिसत आहे. एवढेच नाही तर परिसरात राहणाऱ्या कोकणी जनतेला गळाला लावण्यासाठी शर्माचे विशेष प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. कोकणातल्या जनतेसाठी अवघ्या १०० ते २०० रुपयात कोकण प्रवासाचे गाजर शर्मा आणि त्यांचे कार्यकर्ते दाखवत आहेत. त्यासाठी नालासोपारा आणि विरार शहरात ५० बसेसही तयार ठेवण्यात आल्या आहेत. गोविंदा पथकांसाठीही शर्मांचा फोटो छापलेले टी-शर्ट मोठ्या प्रमाणात वाटले जात आहेत.
नालासोपाऱ्यात पीएस फाउंडेशनच्या वतीने छत्रीवाटपापासून सुरू झालेला प्रचार आता दहीहंडी उत्सव ते गणेशोत्सव उत्सवापर्यंत पोहोचला आहे. शहरात प्रदिप शर्मा यांच्यासाठी बॅनरबाजी सुरू आहे. त्यावर शर्मा यांचा उल्लेख भावी आमदार असा केला जात आहे.
एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची कारकिर्द...
प्रदीप शर्मांची चकमकफेक अधिकारी अशी ओळख आहे. १९८३ मध्ये प्रदीप शर्मा पोलीस दलात दाखल झाले. त्यांनी आत्तापर्यंत १०० हून अधिक गुन्हेगारांचे एन्काउंटर केले आहे. गुंड विनोद मटकरचे शर्मा यांनी केलेले एन्काउंटर विशेष गाजले. परवेझ सिद्दीकी, रफिक डबावाला, सादिक कालिया या कुख्यात गुंडांचाही खात्मा शर्मा यांनीच केला केला आहे. लखनभैय्या बनावट चकमकप्रकरणी शर्मांना अटक करण्यात आली होती. २०१३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.
निवडणुकीच्या रिंगणात शर्मा उतरले तर वसईतील गुन्हेगारी आणि घराणेशाही संपुष्टात येईल, असा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. वसई नालासोपारा हा भाग एकेकाळी संघटीत गुन्हेगारीमुळे कुख्यात झालेला भाग. त्यात जर आमदार म्हणून शर्मा यांच्यासारखा अधिकारी मिळाला तर या भागाचा विकास होईल, असा प्रचार सेनेतर्फे केला जात आहे.