पालघर - एम.आय.डी.सीने नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिल्यानंतरही भरपाई मिळत नसल्याने जिल्ह्यातील नवापूर, दांडी, उच्छेळी येथील मच्छिमारांनी आपल्या 60 ते 70 बोटी घेऊन थेट समुद्रात मोर्चा काढला. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्रक्रिया केलेले सांडपाणी खोल समुद्रात सोडण्याची व्यवस्था करण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या कामामुळे पालघर जिल्ह्यातील मच्छिमारांचे नुकसान झाले होते.
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी नवापूर समुद्रकिनाऱ्यापासून 500 मीटर अंतरावर सोडण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरातील मासेमारीवर मोठा परिणाम झाला असून अनेक किनाऱ्यालागतच्या भागात रंगीत रासायनिक पाणी आढळून आले आहे. त्यामुळे, हे सांडपाणी समुद्रकिनाऱ्यापासून 7.1 किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात टाकण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 600 मीटर लांबीचे जलवाहिनीचे तुकडे समुद्रकिनाऱ्यावर तयार करून ते खोल समुद्रात टाकण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे.
हेही वाचा - मत्स्य दुष्काळ जाहीर करून सरकारने नुकसान भरपाई द्यावी; मच्छिमारांची मागणी
समुद्रातील जलवाहिनी टाकण्याच्या कामावेळी खोदून काढलेले दगड तेथेच ठेवण्यात आले होते. या दगडांवर आदळून परिसरातील मच्छीमारांच्या बोटी अपघातग्रस्त झाल्या होत्या. तसेच जलवाहिनीच्या कामामुळे आसपासच्या गावातील मच्छिमारांना मासेमारी करता येत नसल्याने मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानंतर स्थानिक मच्छीमारांची एम.आय.डी.सी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मत्स्यव्यवसाय विभाग, महसूल विभाग आदी अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मच्छिमारांना भरपाई देण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र दीड वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही मच्छीमारांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली गेली नसल्याने मच्छिमारांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
त्यानंतर दांडी, नवापूर, उच्छेळी येथील मच्छिमारांनी आपल्या 60 ते 70 बोटी खोल समुद्रात जलवाहिनी टाकणाऱ्या बोटीच्या ठिकाणी नेऊन आंदोलन केले. जोपर्यंत बाधित माच्छिमारांना नुकसान भरपाई देण्यात येत नाही, तोपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे कोणतेही काम करू दिले जाणार नाही, असा इशाराही मच्छिमारांनी यावेळी दिला आहे.