पालघर - पालघरहून जयपूर येथे लग्नसमारंभाला गेलेल्या 180 वऱ्हाडिंपैकी चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये तीन नगरसेवकांचा समावेश असून या सर्व घटेनमुळे सध्या पालघरकरांची झोप उडाली आहे.
जयपूर येथे लग्नासाठी गेले होते वऱ्हाडी -
पालघरमधील एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाच्या लग्नासाठी नगरसेवक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, डॉक्टर, कारखानदार, बिल्डर आदि काही प्रतिष्ठित व्यक्ती असे तब्बल 180 वऱ्हाडी एका खाजगी विमानाने पालघरमधून जयपूर येथे गेले होते. जयपूर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे सर्व वास्तव्यास होते. लग्न समारंभ पार पाडून पुन्हा पालघरमध्ये आल्यानंतर यापैकी काहीजणांना ताप, सर्दी, खोकला झाला व वैद्यकीय तपासणीत यातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाची लागण झालेल्या चौघांपैकी तीन कोरोनाबाधित पालघर नगरपरिषदेतील नगरसेवक आहेत.
लग्नसमारंभात गेलेल्या सर्व वऱ्हाड्यांना कोरोना चाचणीचे करण्याचे आदेश -
जयपूरला गेलेल्या वऱ्हाडांपैकी चौघांना करोनाची लागण झाल्याने उर्वरित कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतरांना देखील संक्रमण होण्याची भीती पाहता सर्व 180 वऱ्हाडिंना पालघर ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना चाचणी करून घेण्याचे प्रशासनामार्फत आदेश देण्यात आले. यापैकी 80 वऱ्हाडिंनी rt-pcr चाचणी केल्याचे समजते. मात्र, या सगळ्या घटनेमुळे पालघरकरमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे.