पालघर- वसईतील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पेल्हार फाट्याजवळ कंटेनर आणि ऑईल टँकर यांची धडक होऊन अपघातात झाला. या अपघातानंतर टँकरमधील ऑईलने पेट घेतल्याने भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत. अपघाताची ही घटना सोमवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडली.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पेल्हारा फाट्याजवळ गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक कंटेनरला एका ऑईल वाहतूक करणाऱ्या टँकरने धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातामध्ये ऑईलने भरलेल्या टँकरने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच तातडीने वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तब्बल दोन ते अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले.
ऑइलचा टँकर असल्याने आगीची तीव्रता अधिक वाढली होती. यामुळे नालासोपारा , विरार या ठिकाणाहून आग विझविण्याचे बंब मागविले होते. या लागलेल्या आगीत कंटनेर आणि ऑइल टँकर दोन्ही जळून खाक झाले आहेत. तर यात ऑइल टँकर चालक जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.