पालघर - जिल्ह्यातील तलासरी येथील वेवजीच्या जंगलात अज्ञातांनी नौदलातील सैनिक सुरजकुमार दुबे यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना (शनिवार) समोर आली होती. या प्रकरणी पोलीस तपासात आणखी वेगळी माहिती समोर आली असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. हे संपूर्ण प्रकरण आता वेगळे वळण घेत असल्याचे समोर येत असून तपासात पुढे काय निष्पन्न होते, हे पाहावे लागणार आहे.
चेन्नई ते पालघर हा प्रवास कसा झाला -
सुरजकुमार यांचे चेन्नई विमानतळावरून अपहरण करण्यात आले. तेथून त्यांना पालघरमधील तलासरी वेवजी येथील जंगलात आणून पेट्रोल टाकून जिवंत जाळले, अशी माहिती स्वतः सुरजकुमार यांनी मृत्यू अगोदर दिलेल्या जबावात दिली होती. मात्र, पालघर पोलीसांनी मागील दोन दिवसांत केलेल्या तपासात आणखी वेगळी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागत आहे. हैदराबादवरून कोईंबतूरला जाण्यासाठी बरीच कनेक्टिंग विमाने आहेत. मात्र सुरजकुमार दुबे चेन्नईला कसे पोहचले? त्यांचा चेन्नई ते पालघर असा 1400 किलोमीटरचा प्रवास कसा झाला ? याचा तपास सध्या पालघर पोलीस करत आहेत. सुराजकुमार दुबेचा संपर्क बंद झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी नौदलाशी संपर्क करून मुलाशी संपर्क होत नसल्याची माहिती दिली होती.
सुरजकुमार गेलेल्या ठिकाणांची सीसीटीव्ही फुटेज तपासणी -
रविवारपासून सुरू झालेल्या तपासात सुरजकुमार दुबे हे चेन्नईच्या विमानतळावर खुलेआम फिरत असल्याचे सीसीटीव्हीद्वारे दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांनी ज्या एटीएममधून पैसे काढले. त्या एटीएमचे फुटेज तपासणे बाकी आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पालघर जिल्हा पोलिसांनी दहा पथके तयार केली असून सुमारे शंभर पोलीस अधिकारी, कर्मचारी विविध पातळीवर तपास करत आहेत. याप्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची पथके झारखंड व इतर ठिकाणी गेली आहेत.
सुरजकुमार दुबेंकडे होते तीन मोबाईल, मात्र तिसऱ्या मोबाईलची घरच्यांना नव्हती माहिती -
मृत नौदल सैनिक सुरजकुमार दुबे यांचे दोन मोबाईल अपहरण झाले. त्यावेळी बंद होते. मात्र, त्यांचा तिसरा क्रमांक वापरून त्याद्वारे शेयर मार्केटचे व्यवहार केले असल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आल्याची माहिती पोलीस अधिक्षक यांनी दिली आहे. 1 फेब्रुवारी रोजीपर्यंत हा तिसरा क्रमांक चालू होता, असे त्यांच्या एका नातेवाईकांनी पोलिसांना संगितले. या क्रमांकविषयी त्यांच्या घरच्यांना माहिती नसल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
शेअर बाजारातील गुंतवणूक व कर्ज -
मृत सैनिकाच्या बँक खात्यांची तपासणी केली असता शेअर बाजारात त्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचे तसेच कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. तसेच मित्रांकडून देखील त्यांनी लाखोंचे कर्ज घेतले व हे कर्ज फेडण्याचे आश्वासन दिले, मात्र तसे कधीच केले नाही. 15 जानेवारी रोजी सुरज कुमार दुबे यांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर त्याच्या सासरवाडीच्या लोकांनी त्यांच्या बँक अकाउंटमध्ये व इतरप्रकारे त्यांना सुमारे 9 लाख रुपये दिले होते. मात्र, आता बँक अकाउंटमध्ये रक्कम शिल्लक राहिलेली नाही.
काय आहे घटना -
सुरजकुमार मिथिलेश दुबे (वय 27) झारखंड राज्यातील रहिवासी हे भारतीय नौदलात 2001 साली सिबिंग सीमॅन पदी रुजू झाले होते. 31 जानेवारी रोजी सुरजकुमार मिथिलेश दुबे चेन्नई विमानतळावर पोहचल्यावर तेथे तीन अज्ञातांनी त्यांचे अपहरण केले. त्यांना तीन दिवस चेन्नईमध्ये अज्ञात स्थळी कोंडून ठेवण्यात आले व त्याच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र, त्यांनी अपहरणकर्त्यांना पैसे देण्यास नकार दिला. 5 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र- गुजरात सीमेलगत, पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी गावानजीक पश्चिम घाटातील जंगलात सकाळी नऊच्या सुमारास अपहरणकर्त्यांनी त्यांना आणलं. जंगलात रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत अपहरणकर्त्यांनी सुरज कुमार मिथिलेश दुबे यांच्या शरीरावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवलं आणि अपहरणकर्ते फरार झाले. वेवजी गावच्या जंगलात विवस्त्र आणि आगीत होरपळलेल्या अवस्थेतील एका व्यक्तीला स्थानिकांनी पाहिले. स्थानिकांनी घोलवड पोलीस ठाणेअंतर्गत वेवजी पोलीस चौकी येथे आगीत होरपळलेला इसम आढळल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत, आगीत होरपळलेल्या सुरजकुमार मिथिलेश दुबे याला डहाणूच्या आगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. चौकशी दरम्यान दिलेल्या जबाबात पोलिसांना दुबे याने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला मुंबईत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी दुपारच्या सुमारास सुरजकुमार मिथिलेश दुबे यांचा मृत्यू झाला. अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी घोलवड पोलीस ठाण्यात तीन अज्ञातांविरोधात भा.द.वि.स. कलम 307, 364, 392 आणि 34 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.