पालघर - जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे जव्हार शहरातील पर्यटनस्थळ असलेल्या हनुमान पॉईंटच्या खाली चोथ्याची वाडीजवळचा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे या भागातील जवळपास 35 गाव-पाड्यांचा संपर्क तुटला आहे. तर सेलवास - जव्हार बायपास मार्गाला देखील मोठा तडा जावून संपूर्ण रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे जव्हार बायपास रोड बंद करून जव्हार शहरातून वाहतूक वळवण्यात आली आहे.
जव्हार शहराला लागून असलेल्या पर्यटनस्थळ हनुमान पॉईंटच्या खाली नागमोडी वळणावर चोथ्याचीवाडी गावाजवळ रस्ता वाहून गेला आहे. हा रस्ता वाहून गेल्याने जवळ-जवळ 20 ते 25 फुट रस्त्यात खड्डा पडला आहे. त्यामुळे झाप, साकुर दोन्ही मार्ग बंद झाले आहेत. साकुर रामखिंडमार्गे जाणारा वाडा-ठाणे मार्गही बंद झाला आहे. त्यामुळे या झाप-साकुर भागातील 35 गाव-पाड्यांचा संपर्क तुटला आहे.
या परिसरात 2 आश्रमशाळा आहेत. साकुर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. झाप येथे आरोग्य उपकेंद्र आहे. मात्र, या भागाकडे जाणारा रस्ताच बंद झाल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. तसेच या परिसरातील जव्हार येथे शाळा, कॉलेजला येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मोठी अडचण होत आहे.