विरार : विरारमध्ये राहणारे आयर्नमॅन हार्दिक पाटील ( Ironman Hardik Patil ) यांनी १७ वी कॅलिफोर्निया आयर्नमॅन स्पर्धा ( California Ironman Competition ) २०२२ यशस्वीरित्या नुकतीच पूर्ण केली आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे मागील आठवड्यामध्येच नेदरलँड देशातील अँमस्टरडॅम येथे पार पडलेली T C S पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा देखील हार्दिक पाटील यांनी एक दोन वेळा नव्हे तर तब्बल नव्यांदा पूर्ण केली आहे.
महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली : मागील दोन आठवड्यांमध्ये १७ वी कॅलिफोर्निया आयर्नमॅन स्पर्धा २०२२ तसेच T C S पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा यांमध्ये आयर्नमॅन हार्दिक दयानंद पाटील यांनी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. हार्दिकच्या या कामगिरीबद्दल विरार वसईकरांसह संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली गेली आहे. हार्दिक पाटील यांच्या कामगिरीचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
अशी असते ट्रायथलॉन रेस : फुल आयर्नमॅन ही वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशन (डब्ल्यूटीसी) द्वारे आयोजित ट्रायथलॉन रेस आहे. यात 4 किमी पोहणे, 180.2 किमी सायकल चालवणे आणि 42.2 किमी धावणे यांचा समावेश असतो. या तिन्ही शर्यती क्रमाने आणि ब्रेकशिवाय पूर्ण करायच्या असतात. 17 तासांच्या कालावधीत ही आव्हाने पार पाडावी लागतात.
अनेक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमांच्या नोंदी : यापूर्वी वसई तालुक्यासह पालघर, ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या प्रोफेशनल बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून हार्दिक पाटील यांनी ज्युनिअर महाराष्ट्र श्री व सिनियर श्री यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून नाव कमावले आहे. २०१५ मध्ये पहिल्यांदाच फुल आयर्नमॅनचा किताब पटकावून आर्यनमॅन हार्दिक दयानंद पाटील यांनी आपली घोडदौड सुरु ठेवली होती. हार्दिक पाटील यांनी चार वेळा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच चार वेळा वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया आणि तीन वेळा एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या विक्रमांच्या नोंदी नोंदविल्या आहेत. हार्दिकने आजवर शिकागो, न्यूयॉर्क, टोकियो, बोस्टन, लंडन, न्यूझीलँड, मेक्सिको, डेन्मार्क, तैवान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशात जाऊन स्पर्धा पूर्ण केल्या आहेत.
एक तास तरी फिटनेससाठी द्या : स्पोर्टस असो अथवा इतर कोणतही क्षेत्र असो, कितीही व्यस्त असाल तरी दिवसातला किमान एक तास तरी फिटनेससाठी द्या. कोणतही यश मिळवण्यासाठी सातत्य, मेहनत, जिद्द आणि आपला फोकस किती महत्त्वाचा आहे. आयर्न फिटनेस क्लबच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातून सक्षम असलेले आयर्नमॅन घडवण्यासाठी लागणार ट्रेनिंग आणि आर्थिक व्यवस्था करणार आहे. त्यासाठी आयर्नमॅन फिटनेस क्लब जॉइंट केल्यास त्यांना सहकार्य करता येईल.