वसई/विरार (पालघर) - विश्रांती घेतलेल्या पावसाने वसईकरांना पुन्हा एकदा गुरूवारी (17 जून) तडाखा दिला. आज सकाळपासूनच धो-धो कोसळणार्या पावसाने वसईकरांची वाट पुन्हा एकदा खडतर केली. अनेक सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन पुन्हा एकदा कोलमडून पडले. वसईतील महामार्गावरील परिसर, नालासोपारा शहरातील बराचसा भाग आणि विरारमधील विवा महाविद्यालय व आजूबाजूच्या परिसरात पाणी साचले. त्यामुळे वाहनहचालकांना पाण्यातून वाट काढण्याची कसरत करावी लागली.
या जलसंकटाला कारणीभूत कोण? वसईकरांचा सवाल
वसई जलमय झाली. त्यामुळे या संकटाला कारणीभूत कोण? असा एकच सवाल आता वसई-विरारमधील नागरिकांनी महापालिकेसमोर उपस्थित केला आहे. 31 मे पर्यंत 100 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करणार्या महापालिकेचे पित्तळ यानिमित्ताने उघडे पडल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकातून येत आहेत.
वाहतूक मंदावली
वसई-विरारमधील जलसंकट हा वर्षागणिक चिंतेचा विषय ठरत चालला आहे. भरवस्तीत पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागते. पालिकेच्या निष्क्रीय कारभारामुळे वसईकरांना पुन:पुन्हा पुराचा फटका सोसावा लागत आहे. आज गुरुवारी सकाळपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे वसईत ठिकठिकाणी पाणी साचले. मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने पाण्यातून वाट काढत वाहनचालकांना जावे लागत असल्याचे चित्र दिसून आले. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ससुपाडा-मालजीपाडा दरम्यान पाणी साचले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. विरारमध्ये वर्दळीच्या ठिकाणीच पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
अर्नाळा-वसई रोडवरील 80 वर्षे जुने झाड कोसळले
विरार पश्चिमेतील अर्नाळा-वसई रोडवरील नाळे-अख्तरवाडी मार्गावरील सुमारे 80 वर्ष जुने वडाचे झाड उन्मळून पडले. हा महाकाय वृक्ष विद्युत पोलवरच उन्मळून पडल्याने वीजवाहक तारा व खांबाचे नुकसान झाले. काही काळ या भागातील विद्युत पुरवठाही बंद ठेवण्यात आला होता.
विरार-नालासोपार्यात पाणीच पाणी
नालासोपारा व विरार शहरातील सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले. वसईतही वालीव, गोलानी, सातिवली या भागात पाणी साचल्याने औद्योगिक पट्टा ठप्प झाला होता. दरवर्षी पाणी साचण्याची समस्या मोठी असतानादेखील महापालिकेकडून केवळ मलमपट्टी करण्याचेच काम सुरू आहे. निरी-आयआयटीसारख्या संस्थांनी उपाययोजनांसंदर्भातील अहवाल देऊनही वसई-विरार महापालिका पावसाळ्यातील पुरस्थितीवर कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याने वसईकर संताप व्यक्त करत आहेत.
हेही वाचा - कराडजवळ पुणे-बंगळुरू महामार्ग जलमय, वाहतूक विस्कळीत