पालघर - तालुक्यातील मनोर पाटीलपाडा येथील 26 नागरिकांना विषबाधा ( Food Poisoning in Palghar ) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तेथे साजरा केलेल्या धार्मिक कार्यक्रमादरम्यान भाजलेले मांस खाल्ल्यामुळे विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकारानंतर पाटीलपाडा वासीयांमध्ये घबराट पसरली आहे.
अचानक सुरू झाल्या जुलाब, उलट्या -
गेल्या तीन-चार दिवसांपासून मनोर येथील पाटीलपाडा परिसरातील नागरिकांना जुलाब, उलट्या सुरू झाल्या. त्यानंतर तेथील नागरिक मनोर ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी उपचार घेत होते. मात्र ही संख्या अचानक वाढल्यामुळे आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये 26 नागरिकांना ही बाधा झाली असल्याचे समोर आले. यापैकी सहा ते सात लहान मुलांना बाधा झाली असल्याचे समजते. 14 जण या बाधेतून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. तर पाच जण खाजगी रुग्णालयात व सहा जण मनोर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मांस खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचा अंदाज -
पाटीलपाडा येथे गावदेवाचा धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. या धार्मिक कार्यक्रमादरम्यान भाजलेले मांस खाल्ल्यामुळे प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे येथील विहिरीच्या पाण्यामुळे ही असावी असा देखील वर्तवण्यात येत आहे. दरम्यान तालुका आरोग्य यंत्रणेने परिसराची पाहणी केली असून विहीरीच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. पाटीलपाडा येथे आपात्कालीन कक्ष उभारण्यात आला आहे. याठिकाणी चोवीस तास वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, औषधे, बाह्यरुग्ण विभागाची यंत्रणा उभारण्यात आली आहे. पाणी उकळून पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा - Mother Son Fell from Train : भंडाऱ्यात धावत्या रेल्वेतून पडून आई आणि मुलाचा मृत्यू