पालघर - मसाट येथील केमीकल कंपनीला आग लागल्याने खळबळ उडाली आहे. या कंपनीत 6 कामगार अडकले होते, मात्र त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. कंपनीत केमीकलच्या ड्रमचा स्फोट होत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण येत आहे.
दादरा नगर हवेलीचा सिलवासामधील मसाट भाग हा पालघर जिल्ह्याच्या शेजारी आहे. येथील मनीष केमिकल कंपनीला रविवारी रात्री भीषण आग लागली. या आगीमुळे कंपनीतील केमिकलने भरलेल्या ड्रमचे अनेक स्फोट झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. कंपनीला आग लागल्यामुळे सहा कामगार कंपनीच्या आत अडकले होते, त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. आग मोठी असल्याने आजुबाजुच्या कंपनीमधील कामगारांनाही बाहेर काढण्यात आले. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
आगीचे कारण अजूनही अस्पष्ट असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.