पालघर - मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्याठिकाणी आयुक्तपदी गडचिरोली जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. विजय राठोड हे सध्या गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदावर अधिकारी कार्यरत आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव(सेवा) सिताराम कुंटे यांनी राठोड यांना मीरा भाईंदर महानगरपालिकेचा पदभार त्वरित स्विकारावा असा आदेश जारी केला आहे.
२०११ ला मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त पदी थेट विक्रम कुमार (भाप्रसे) यांची नियुक्ती झाली होती त्यानंतर सुरेश काकाणी, सुभाष लाखे, अच्युत हांगे, बीजी पवार, डॉ. नरेश गीते, बालाजी खतगावकर यांनी काम पाहिले. तत्कालीन आयुक्त बालाजी खतगावकर यांची १५ फेब्रुवारी २०२० रोजी नगरविकास विभागात बदली झाली आणि त्याच्या जागी मीरा भाईंदर महानगरपालिकेचा पदभार चंद्रकांत डांगे(भाप्रसे) यांनी स्विकारला. आठ वर्षात मिरा भाईंदर महानगरपालिकेला आठ आयुक्त मिळाले परंतु, यापैकी एकही आयुक्तांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला नाही.
१५ फेब्रुवारी २०२०ला मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर कोरोनाचे संकट समोर आले. तसेच, मीरा भाईंदर परिसरात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, मृत्यूदरही मोठ्या प्रमाणावर आहे. याच पार्श्वभूमीवर बदली झाली का, कोरोना भोवला का, अशी चर्चा सध्या मीरा भाईंदर नागरिकांमध्ये सुरू आहे.