पालघर - विक्रमगड विधानसभा मतदारसंघात भाजप विरोधात बंड करणाऱ्या तिन्ही उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीत बंडाची धार बोथट करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता महायुतीचे उमेदवार हेमंत सवरा यांना होणाऱ्या विरोधाचा अडसर दूर होऊ शकतो.
विक्रमगड विधानसभा मतदारसंघासाठी भाजपकडून माजी मंत्री विष्णू सवरा यांचा मुलगा हेमंत सवरा यांना उमेदवारी मिळाल्याने भाजपमधील इच्छुक नाराज झाले होते. हेमंत सवरा हे जव्हार येथील प्रांत कार्यालयात अर्ज भरत असताना भाजपचे झेंडे हाती घेत हरिश्चंद्र भोये, सुरेखा थेतले, मधुकर खुताडे यांनी भाजपमधील काही पदाधिकारी व सहकारी यांच्यासोबत शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल केला.
हेही वाचा - विक्रमगड मतदारसंघात महायुती आणि आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल
हेमंत सवरा यांनी निष्ठावान कार्यकर्ता माझ्या सोबत असुन महायुतीचे घटकपक्षांचाही मला पाठिंबा आहे, असे सांगितले होते. मतदारसंघात भाजपने दिलेल्या उमेदवारीत बदल करावा या मागणीसाठी काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लागलीच वर्षा बंगला गाठला होता. परंतु, तेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नव्हती.
हेही वाचा - नरेंद्र मेहतांचा भाजपच्या तिकिटावर अर्ज दाखल; गीता जैन यांची बंडखोरी कायम
त्यांनतर, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी या बंडोबांची मुंबईत भेट घेऊन त्यांना थंड करण्याचा प्रयत्न केला आहे. 7 ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. या दिवशी हे बंडखोर अर्ज मागे घेतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.