पालघर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अनधिकृतपणे विल्हेवाटीसाठी जात असलेला रासायनिक घनकचऱ्याचा ट्रक बोईसर पोलिसांनी पकडला. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्यातून घातक घनकचऱ्याने भरलेला ट्रक धारावी येथे अनधिकृतपणे नेला जात होता. तो ट्रक बोईसर पोलिसांनी पकडला असून, या ट्रकमध्ये घातक स्वरूपातील ६ हजार ४१० किलो घनकचरा असल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनिलेक्स एक्स्पर्ट लि. प्लॉट नं. ई-२ या कंपनीमधील ३ हजार ३३० किलो वजनाच्या घातक घनकचऱ्याने भरलेल्या प्लास्टिक बॅगा आणि ३ हजार ८० किलो वजनाच्या केमिकलने माखलेल्या रिकाम्या प्लास्टिक बॅगा हा अती प्रदूषित घनकचरा ट्रकमध्ये आढळला. हा कचरा तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट यांच्याकडे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाटीसाठी न पाठवता मुंबईतील धारावी येथे घेऊन जात होता. त्यावेळी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कॅम्लीन नाका परिसरात बोईसर पोलिसांनी हा ट्रक पकडला.
या संदर्भातील पत्र बोईसर पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर विभागाचे उप-प्रादेशिक अधिकारी मनीष होळकर यांना देण्यात आले. त्यानंतर त्यांनी घनकचरा आणि सदर वाहनचालकाकडील कागदपत्रांची पाहणी केली. गंभीर बाब म्हणजे बोईसर पोलीस ठाण्यात या ट्रकमधील मालाची तपासणी केली असता, वर केमिकलने माखलेल्या रिकाम्या प्लास्टिक बॅगा तर त्याखाली घातक घनकचऱ्याने भरलेली प्लास्टिक बॅग आढळून आली. ट्रक पकडल्याक्षणी चालकाकडे कोठल्याही प्रकारची कागदपत्रे नव्हती. मात्र, त्यानंतर कागदपत्रे सादर केल्याचे बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी सांगितले. चौकशीअंती आणि नमुने तपासणी अहवालानंतर वास्तव समोर येणार असल्याचे कसबे म्हणाले.
या घातक घनकचर्याचे रसायनमिश्रीत प्लास्टिक नमुने हे युनिलेक्स एक्सपर्ट लि. कंपनीचे मॅनेजर संजयकुमार शर्मा (५८) यांच्या समक्ष घेतलेले असून, ते सीलबंद करण्यात आले आहेत. त्यातील एक भाग हा रासायनिक तपासणीसाठी पाठविण्याकरता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. उर्वरित दोन भाग हे प्रदूषण नियंत्रण मंडळाने ताब्यात घेतले आहेत. घातक घनकचरा वाहून नेण्यासाठी वापरलेला ट्रक बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.