पालघर - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून नव्या ३८ रुग्णांची नोंद झाली आहे. हे सर्व बाधित बोईसर आणि खैरापाडा ग्रामपंचायत क्षेत्रातील आहेत. तर आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. या भागात कम्युनिटी स्प्रेडचा धोका वाढल्याने प्रशासनाने कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. यासाठी बोईसर व खैरापाडा ग्रामपंचायत परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे.
बोईसर व खैरापाडा ग्रामपंचायत क्षेत्रांतर्गत येणारी गावे व पाडे प्रतिबंधित क्षेत्रात येत असल्याने अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा वगळता अन्य दुकानं बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत. बोईसर बस डेपो बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून पेट्रोल पंप चालकांना देखील आदेश देण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांची वाहने वगळता सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. मत्स्य विक्री तसेच मत्स्य बाजार बंद ठेवण्याचे प्रशासनाने सांगितले आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक गोष्टी वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.