पालघर: दृष्टीहिनांच्या अंधःकारमय विश्वात तेजोमयी प्रकाश ठरणारे हे एक महत्त्वपूर्ण दान आहे. मृत्यूनंतरही आपल्या डोळ्यांनी दृष्टीहिनांना हे जग पाहता यावे, अनुभवता यावे, या उदात्त हेतूने काहीजण मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करतात. तो संकल्प त्यांच्या मृत्यूपश्चात शोकाकूल कुटुंबीय अत्यंत धीरोदात्तपणे आणि सकारात्मकतेने पूर्णही करतात. नेत्रदानाच्या या संकल्पसिद्धीसाठी काही संस्था सतत झटत असतात. डहाणू शहरातही असा संकल्प करणारे नेत्रदाते, त्यांचे कुटुंबीय आणि संकल्पपूर्तीसाठी झटणाऱ्या संस्थेच्या कार्याचा नुकताच प्रत्यय आला आहे. डहाणूतील काटीरोड येथील रहिवासी बिपीन शांतीलाल भुत्ता यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. तत्पूर्वी, त्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्यांनी याबाबत त्यांचे पुत्र रोटरी क्लब ऑफ डहाणूचे सदस्य तथा व्यावसायिक निकुंज भुत्ता आणि प्रियेश भुत्ता यांना याबाबत कल्पना दिली होती. मृत्यूनंतर माझे डोळे दान देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले होते.
वडिलांची नेत्रदानाची इच्छा पूर्ण: बिपीन भुत्ता यांच्या निधनानंतर शोकमग्न असतानाही निकुंज आणि प्रियेश यांनी वडिलांची नेत्रदानाची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी तातडीने रोटरी बोरिवली आय बँकेशी संपर्क केला. त्यानुसार त्यांच्या घरी डॉ. राजेंद्र चव्हाण व डॉ. राजेंद्र तिवारी यांनी बिपीन भुत्ता यांचे डोळे यशस्वीरित्या काढले. त्यानंतर हे डोळे रोटरी बोरिवली आय बँकेकडे सोपविण्यात आले. बिपिन भुत्ता यांच्या आईनेही अशाच प्रकारे मरणोत्तर नेत्रदान केले होते. आईच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनीही नेत्रदान केले. भुत्ता परिवारातील नेत्रदानाची ही परंपरा पिढ्यान्पिढ्यांपासून सुरू आहे. या माध्यमातून भुत्ता परिवाराने अनेकांना दृष्टी देऊन त्यांच्या जीवनात प्रकाश आणला आहे. दरम्यान, निकुंज भुत्ता आणि प्रियेश भुत्ता यांनीही पिढ्यान्पिढ्या चालत आलेली ही परंपरा आपणही कायम ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या मृत्यूनंतरही देहदान, नेत्रदानाच्या माध्यमातून इतरांना नवे जीवन देऊ शकतो. इतरांनीही मरणोत्तर नेत्रदान करून दृष्टीहिनांना आपल्या डोळ्यांनी जग पाहण्याची संधी द्यावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
नेत्रदानाच्या संकल्पपूर्तीसाठी सज्जता: रोटरी बोरिवली आय बँकेसह नेत्र रुग्णालय आहे. तिथे दान केलेले डोळे शस्त्रक्रिया करून नेत्रहिनांना दिले जातात. महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर साईटवर गरजू नेत्रहिनांची यादी असते. त्यानुसार त्यांना शासनाच्या नियमानुसार शस्त्रक्रियेद्वारे नेत्र प्रत्यारोपण केले जाते. शस्त्रक्रियेच्या माध्यमातून दोन व्यक्तींना प्रत्येकी एका डोळ्याचे प्रत्यारोपण केले जाते. पालघर जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 25 ते 30 जणांनी नेत्रदान केले आहे. रोटरी बोरिवली आय बँकेसोबतच रोटरी क्लब ऑफ डहाणूचे अध्यक्ष संजय कर्नावट आणि मेडिकल चेअर रोटेरियन रिझवान खान यांच्याकडूनही नेत्रदानासाठी जागृतीचे कार्य केले जात आहे.
आपली दृष्टी मागे सोडा: व्यक्तीचा मृत्यू झाला तरी, डोळे कधीच मरत नाहीत. ते इतरांना देऊन अमर केले जाऊ शकतात. व्यक्ती नेत्रदानाचा संकल्प करून दोन दृष्टीहिनांना नवी दृष्टी देऊन आपल्या डोळ्यांनी जग पाहू शकते आणि जीवनाच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकते. मानवतेला देता येऊ शकणारी दृष्टी ही सर्वांत मौल्यवान भेट आहे. मनुष्य जगतो तेव्हा हसत-खेळत प्रेमाचा प्रसार करू शकतो, तर मृत्यूनंतरही नेत्रदानाच्या माध्यमातून इतरांना आपली दृष्टी देऊन प्रेम, आपुलकीची भावना कायम ठेवू शकतो. त्यामुळे आपली दृष्टी मागे सोडा, अशी भावना नेत्रदानाच्या क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवींनी व्यक्त केली आहे.