पालघर - भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जनतेशी कोणतेही भावनिक नाते नाही, युपीए सरकारच्या काळात पेट्रोल अवघे एका रुपयांनी वाढले तरी, भाजपाचे नेते रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. आता तर पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. आता ते आंदोलन करणारे नेते कुठे गेले? त्यांचा शोध घ्यायला हवा अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ते आज पालघर दौऱ्यावर असताना बोलत होते. त्यांनी यावेळी जिल्ह्यात चक्रिवादळामुळे झालेल्या नुकसानाचा तसेच कोरोना परिस्थितीचा देखील आढावा घेतला.
नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे - थोरात
पालघर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. मात्र एवढ्यावरच समाधानी होऊन चालणार नाही, तर पालघर जिल्हा हा कोरोनामुक्त झाला पाहिजे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर नागरिक पुन्हा गर्दी करतात, आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो. नागरिकांनी असे न करता कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन देखील यावेळी थोरात यांनी केले आहे.
हेही वाचा - जीएसटी कौन्सिल समितीचे अध्यक्षपद मेघालयला, केंद्राकडून महाराष्ट्राचा अपमान - मुश्रीफ