पालघर - वसई तालुक्यातील तुंगारेश्वर येथे सदानंद महाराज आश्रम जमीनदोस्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, आश्रमावर सुरू असलेल्या कारवाईचे पालघरमध्ये पडसाद उमटू लागले आहेत. या कारवाई विरोधात आक्रमक होत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग तब्बल अर्धा तास रोखून धरला.
पालघर तालुक्यातील मनोर जवळील वाडा-खडकोना येथे हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते अचानक महामार्गवर उतरले व रास्ता रोको केला. यामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल अर्ध्या तासानंतर मनोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत 15 ते 20 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
वसई पूर्वेकडील तुंगारेश्वर डोंगरावर ४८ वर्षांपासून सदानंद महाराज यांचे आश्रम उभे आहे. याबाबत पर्यावरणवादी कार्यकर्ते देबी गोयंका यांच्या ‘कन्झर्वेशन अॅक्शन ट्रस्ट’ या संस्थेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालाने निर्णय देताना आश्रम बेकायदा ठरवला आणि त्यावर कारवाई करण्याचे आदेश वनविभागाला दिले.
हेही वाचा - आगरी सेना देणार काँग्रेस, बविआला धक्का, बविआचे नगरसेवक सेनेच्या संपर्कात...
कारवाईसाठी आठवडय़ाचा कालावधी देण्यात आला होता. परंतु या आदेशानंतर कारवाईसाठी अडचणी निर्माण झाल्याने विहित मुदतीत कारवाई होऊ शकली नव्हती. यावर न्यायालयाने ३१ ऑगस्टपर्यंत हा आश्रम जमीनदोस्त करण्यात यावा, असे आदेश दिल्याने वनविभागाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. कारवाईसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नयेत, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी तीन हजार पोलीस डोंगराच्या आजूबाजूच्या परिसरात तैनात करण्यात आले आहेत.
हेही वाचा - पालघर येथे टोमॅटोच्या टेम्पोमधून अवैद्य दारुची तस्करी; 13 लाख किमतींचा मुद्देमाल जप्त