पालघर- खाते वाटपावरून अब्दुल सत्तार यांच्या मनात कोणतीही नाराजी नसून त्यांच्याशी माझे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बोलण झाले असल्याचे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. सत्तार यांनी राजीनामा दिलेला नाही तसेच पक्षविरोधी भूमिकाही घेतली नाही, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
खातेवाटप झाले असून लवकरच ते तुमच्यासमोर येईल, असे म्हणत अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरे यांच्या वादावर काहीही बोलण्यास एकनाथ शिंदे यांनी टाळाटाळ केली. पालघर जिल्हा परिषद व ८ पंचायत समित्यांच्या होत असलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी झालेली नाही. यावर स्पष्टीकरण देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्याची प्रत्येक स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा असते. त्यांनुसार पक्षप्रमुख व स्थानिक पातळीवर हे सर्व निर्णय घेतले जातात. स्थानिक पातळीवर स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार व स्थानिक समीकरणानुसार ही निवडणूक शिवसेना स्वतंत्रपणे लढवत आहे. या निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा- ऐकावं ते नवलचं..! वसईत कोंबडीने दिला चार पायाच्या पिल्लाला जन्म