वसई-विरार Police Raid On Ganeshotsav Mandal : विरार पश्चिमेतील आगाशीजवळ कोल्हापुरातील गणेशोत्सव मंडपात काही मुले पत्ते खेळत होती. अर्नाळा सागरी पोलिसांचं एक गस्ती वाहन त्या ठिकाणी शनिवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास छापा टाकण्यासाठी आलं. तेव्हा पोलिसांना पाहताच मुलं पळू लागली. यात प्रचित विनोद भोईर (19) हा मुलगा धावत असताना पडला होता. त्याला विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, तिथं त्याचा आधीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
पोलिसांच्या हलगर्जीपणामुळंच मुलाचा मृत्यू : त्यामुळं गावात तणावाचं वातावरण होतं. खबरदारी म्हणून पोलिसांनी संजीवनी हॉस्पिटलमध्ये बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळंच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी छापा टाकण्याची गरज नव्हती. पोलिसांनी वेळीच प्राथमिक उपचार केले असते, तर त्याचा जीव वाचला असता, असा आरोप मृत प्रचितच्या नातेवाईक निशिगंधा म्हात्रे यांनी केला.
मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू : मुलाला मारहाण केली नाही. धावत असताना हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मोकाशी यांनी सांगितलं. आम्ही मंडपावर प्रत्यक्ष छापा टाकला नाही. रात्री पोलिसांचं फक्त गस्तीचं वाहन जात होतं. अर्नाळा सागरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणवर कर्पे यांनी सांगितलं की, पोलीस त्यांना पकडतील या भीतीनं मुलं पळून गेली. त्यातच पळताना त्यातील एक मुलगा पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गणेशोत्सव काळात काही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचे सर्वत्र लक्ष असते. त्यातच जर काही अनैतिक कृत्य कुणी करत असल्याचं दिसल्यावर गस्ती पथकाकडून पाहणी करण्यात येते. तसंच गरज पडल्यास कारवाईही करण्यात येते. त्याअनुषंगाने पोलिसांची खबरदारी म्हणून उत्सवावर नजर असते. आता या मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतरच कळणार आहे.
हेही वााचा -