उस्मानाबाद - नियमबाह्य पुस्तक विक्री करणाऱ्या ग्रीनलँड या शाळेवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने धाड टाकली होती. मात्र, कारवाई न करताच संगनमत झाल्याचा आरोप करत तक्रारदार दादा कांबळे यांनी शाळेवर करावाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातल्या नामांकित असलेल्या ग्रीनलँड शाळेत नियमबाह्य पुस्तक विक्री होत असल्याची तक्रार दादा कांबळे यांनी केली होती. त्यावरून शिक्षण विभागाच्या गट शिक्षणाधिकारी पी.एम. मोकाशे यांनी शाळेवर धाड टाकली. यावेळी शाळेत अभिलेख तपासले असता त्यात प्रचंड त्रुटी आढळल्या. त्याचबरोबर शाळेतील मुख्याध्यापक असलेल्या स्वामी यांच्या घरात नियमबाह्य पुस्तके ठेवले असलेले आढळले. मात्र, यावेळो ही पुस्तके जप्त केली नाहीत, त्याउलट शाळेला २ दिवसात चुकलेली प्रक्रिया पुन्हा घेऊन झालेली चूक सुधारण्याची संधी दिली. तसेच शाळेवर कोणतीही कारवाई केली नाही. याबाबत तक्रारदार समाधानी नसून ठोस कारवाईसाठी त्यांनी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.