उस्मानाबाद - गेल्या सहा महिन्यांपूर्वीच उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या आवारात डांबरीकरण करण्यात आले. पण याचाच त्रास जिल्हा परिषदेच्या कार्यालयात येणाऱ्यांना होत आहे. निकृष्ठ कामामुळे परिसरातील डांबरीकरण ठिकठिकाणी उखडले आहे. त्यातच पावसाळा सुरु असल्याने सर्वत्र पाण्याची तळी साचत आहेत. त्यामुळे आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या सर्वानाच यातून वाट काढताना कसरत करावी लागत आहे.
साधारण सहा महिन्यांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेश द्वारापासून ते जिल्हा परिषद इमारतीच्या प्रमुख द्वारापर्यंत डांबरीकरण करण्यात आले. मात्र, याचे काम व्यवस्थित करण्यात आले नसल्याने या परिसरात सर्वत्रच पावसाचे पाणी साचते. त्यामुळे येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांना कसरत करून आत जावे लागत आहे. तर चारचाकी वाहन आल्यामुळे वाहनाच्या चाकामुळे लोकांच्या अंगावरती चिखल उडत आहे. या संबंधी ई.टीव्ही भारत ने बांधकाम विभागाशी संपर्क केला असता या संबंधी काही माहिती नसल्याचे सांगितले. याप्रकरणाची माहिती घेऊन कारवाई केली जाईल, अशी माहिती सुनिता पाटील कार्यकारी अभियंता यांनी दिली.