उस्मानाबाद - आषाढी वारीसाठी राज्यभरातून पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. त्याप्रमाणेच लाखो भाविकांचे दैवत असलेले श्री गजानन महाराजांची पालखीही पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास गजानन महाराजांची पालखी उस्मानाबाद शहरात दाखल झाली. यावेळी मोठ्या भक्तीमय वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले.
दरवर्षी आषाढी वारीसाठी जाणारी गजानन महाराजांची पालखी उस्मानाबादमध्ये मुक्कामी राहते. सालाबादाप्रमाणे ज्ञानेश्वर मंदिर परिसरात पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. पालखीचे हे ५२ वे वर्ष आहे. गजानन महाराजांच्या या दिंडीत शुभ्र वस्त्र परिधान केलेली आणि भगवी पताका घेतलेले सुमारे सातशे वारकरी दाखल आहेत. या सर्व वारकऱ्यांच्या स्वागतासाठी उस्मानाबादकरांनी जागोजागी रांगोळ्या काढल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
पालखी शहरात दाखल झाल्यानंतर दर्शनासाठी नागरिकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. त्यानंतर दिंडीमधील वारकऱ्यांसाठी भोजन व चहापानाची व्यवस्था करण्यात आली. मंगळवारच्या मुक्कामानंतर पालखी बुधवारी सकाळी टाळ-मृदंगाच्या गजरात उस्मानाबाद येथून पंढरपूरकडे रवाना झाली. मंगळावार पासून शहरात संपूर्ण भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले.