उस्मानाबाद - परंडा तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना पाठीशी घालत विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने पीडीत मुलीने सांगितले. याप्रकरणी पीडितीने दि. २८ रोजी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करून न्याय देण्याची मागणी केली आहे. न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा पीडितेने दिला आहे.
परंडा तहसीलदार यांच्यामार्फत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की ओळखीचा फायदा घेत दोन तरुणांनी २६ मार्चला रात्रीच्या सुमारास बळजबरीने पीडितेला मोटार सायकलवर गावापासून दूर अंतरावर नेले. त्यानंतर आळी-पाळीने बलात्कार करुन कोणास सांगितल्यास तुझ्यासह तुझ्या कुटुंबाला मारून टाकू, अशी धमकीही देऊन नराधम निघून गेले. हा प्रकार मुलीने घरी येऊन आई-वडिलांना सांगितल्यावर ते रात्रीच पोलिसात फिर्याद देण्यासाठी गेले. मात्र, पोलिसांनी फिर्याद दाखल न करता मुलीला पोलीस ठाण्यात बसवून घेतले व आई-वडिलांना घरी पाठवले.
दुसऱ्या दिवशी पोलिसांना पीडीत मुलीने दोघांनी बलात्कार केला असल्याचे सांगून देखील, पोलिसांनी मुलीला धमकावत आम्ही सांगू तसेच जवाब दे असे म्हणत केवळ एका आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पीडितेला धमकावत मेडिकल तपासणी करायची नाही, असे लेखी घेतल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. दोन्ही आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करावा व आरोपींना पाठिशी घालणाऱ्या एपीआय पालवे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा, असे तक्रारीत म्हटले आहे. तसेच आरोपीकडून व अंभी पोलिसांकडून मला व माझ्या कुटुंबाला त्रास होण्याची शक्यता असून, आमचे काही बरे वाईट झाल्यास त्यांना जबाबदार धरावे व मला न्याय द्यावा, अन्यथा मी केव्हाही आत्मदहन करेन, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.