उस्मानाबाद - राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद आगाराला पांडूरंग पावल्याचे दिसत आहे. कारण, यंदाच्या आषाढी वारीतून आगाराने ६७ लाख २५ हजार २७३ रूपये उत्पन्न मिळविले आहे. उस्मानाबाद आगारातून १६५ बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. यातून ९९ हजार ५७३ प्रवाशांनी प्रवास केला होता. मागील वर्षीपेक्षा सुमारे २२ लाख ७५ हजार ८३ रूपयाने यंदाच्या गल्ल्यात वाढ झाली आहे.
जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती असतानाही आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी यावर्षी अधिक प्रमाणात वारकऱ्यांनी पंढरी गाठली. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे वारकरी कमी प्रमाणात दिंडीमध्ये सहभागी होतील, असा अंदज वर्तविला जात होता. परंतु, हा अंदाज खोटा ठरवत वारकऱ्यांनी आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतले. जिल्ह्यात पाऊस पडण्यासाठी साकडेही घातले. वारकऱ्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतल्याचा फायदा परिवहन महामंडळाला चांगलाच झाला आहे. गेल्यावर्षी महामंडळाला ४४ लाख ५० हजार १९० रुपये उत्पन्न मिळाले होते. मात्र, या वर्षी त्यात वाढ होऊन हे उत्पन्न ६७ लाख २५ हजार २७३ वर गेले आहेत.