उस्मानाबाद- शहरातील विकलांग असलेल्या सुलाखे बहीण-भावांनी नगरसेवक युवराज नळे यांना फोन करून आमच्या घरातले धान्य संपले आहे. माझी आई देवाघरी गेली असून आईनेच घरातील किराणा साहित्य आणले होते, याच किराणा साहित्यावरती आम्ही भूक भागवत होतो. मात्र, आता किराणा संपला असून आम्हाला ही मदत करा अशी विनंती केली होती. त्यानंतर नगरसेवक युवराज नळे यांनी किराणा साहित्य व अन्नधान्य घेऊन बहीण-भावाची तात्पुरती गरज भागवली होती.
शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी या कुटुंबाची आर्थिक स्थिती पाहून या दोघांना 25 हजार रुपयांची रोख रक्कम देऊ केली आहे. त्याचबरोबर निराधारांना देण्यात येणारी मदत सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून वेळोवेळी लागेल ती मदत देण्याचे आश्वासनही आमदार चौगुले यांनी दिले.
हृदय पिळवटून टाकणारी ही कथा उस्मानाबाद शहरात घडली. कोरोनामुळे सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले असून यामुळे बऱ्याच लोकांच्या हातचे काम सुटले आहे. त्यातच या बहीण-भावाच्या आईचे निधन झाले. सुलाखे कुटुंबात कमावती व्यक्तीही नाही आणि हे दोन्ही बहीण-भाऊ विकलांग असल्याने त्यांची फरफट होत होती. मात्र, आता आमदार चौगुले यांनी यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला आहे.