उस्मानाबाद - जिल्हाधिकऱ्यांच्या आदेशाने आणि पालकांच्या संमतीने काल जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. तब्बल 8 महिन्यांपासून शाळा बंद होत्या. त्यानंतर काल जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. यावेळी पहिल्याच दिवशी शाळांमध्ये जेमतेम विद्यार्थ्यांनी हजेरी लावल्याचे दिसून आहे.
शाळा प्रशासनाकडून खबरदारी
कोरोना संसर्ग वाढू नये, म्हणून जिल्ह्यातील शाळांमध्ये योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टन्स ठेवण्यात आला होता. तसेच, एका बाकावर फक्त एकाच विद्यार्थ्याला बसवण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांची लेखी संमती घेतल्यानंतरच विद्यार्थी शाळेत येऊ शकत होते. तसेच, आजारी असलेल्या मुलांना शाळेत पाठवू नये, असे शाळेतर्फे सांगण्यात आले होते. त्याचबरोबर, पालकांच्या संमतीने घरी राहून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास करता येईल, असे देखील शाळेतर्फे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील 70 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह
शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील निवासी शाळा वगळता इतर 571 शाळेतील शिक्षकांची तपासणी करण्यात आली असून यात 70 शिक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सर्व शाळांमधून 4 हजार 710 शिक्षकांची तपासणी करण्यात आली होती.
कोरोनामुळे पालक चिंतेत
शाळा सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या होत्या. यात अनेक शिक्षकांमध्ये कुठलीही लक्षणे नसताना त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे, विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यामुळेच काल पहिल्या दिवशी बहुतांश विद्यार्थ्यांनी शाळेला पाठ फिरवली.
हेही वाचा - 'नितीन राऊत यांनी ऊर्जामंत्रिपदाचा राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्क म्हणून काम करावं'