उस्मानाबाद - मुरूम येथील सेवानिवृत्त शिक्षक ऋग्वेद कांबळे (वय 75) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मात्र, पित्याच्या अंत्यसंस्काराला मुलाला येता आले नाही. लॉकडाऊनमुळे वडिलांच्या अंत्यसंस्काराला येण्यासाठी असणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेत, तामिळनाडू राज्यात नोकरी करणाऱ्या मुलाने व्हॉटस्अॅपवर व्हिडिओ कॉल करून आपल्या वडिलांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तर मुलीने आणि नातवाने पार्थिवाला मुखाग्नी देत आपले कर्तव्य पार पाडले.
भीमनगर येथे राहणारे सेवानिवृत्त शिक्षक ऋग्वेद गणपती कांबळे यांचे गुरुवारी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. तामिळनाडू येथील करूर याठिकाणी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथे अधिकारी म्हणून कार्यरत असलेला त्यांचा मुलगा विद्यासागर ऋग्वेद कांबळे यांना फोनवरून वडिलांच्या निधनाची बातमी देण्यात आली. मात्र, सध्या जगभरात कोरोना रोगाने थैमान घातले आहे. या रोगाचा संसर्ग वाढू नये म्हणून, संपूर्ण देशात लॉक डाऊनची घोषणा केली आहे. त्यातच एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्या येण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आले आहे. अशा परिस्थितीत त्यांनी व्हॉटस्अॅपवर व्हिडिओ कॉल करून आपल्या वडिलांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.