उस्मानाबाद - मृग नक्षत्र सुरू होताच जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, आता पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. पेरलेले पीक वाया जाते की काय? अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
पावसाने दमदार हजेरी लावताच शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, मूग, तुर, मका अशा पिकांची पेरणी केली. पाऊस पडत नसल्याने ते पीक उगवते की नाही? अशी चिंता शेतकऱ्यांना लागलेली आहे. यात सोयाबीन उगवत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. बोगय बियाण्यांमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशा बोगस वियाण्यांचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले होते. त्याचबरोबर बियाण्यांची कंपनी दोषी आढळल्यास कारवाई करण्याचा इशाराही भुसे यांनी दिला होता. मात्र, आता शेतकऱ्यांना या बोगस बियाण्यांबरोबर दुष्काळाचाही सामना करावा लागतो आहे.
कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. याचा परिणाम रब्बीमध्ये घेण्यात येणाऱ्या पिकांवरही झाला होता. उन्हाळ्यात विक्री होत असलेले फळं, पीक शेतकऱ्यांनी घेतले होते. मात्र, या पिकांना बाजारात विकता आले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला होता. आता खरिपात पावसाने दुर्लक्ष केल्यामुळे रब्बी बरोबरच खरीप पिकही संकटात सापडले आहे