उस्मानाबाद - जलयुक्त शिवार योजनेची चौकशी लावून विरोधी पक्षनेत्याचे तोंड बंद करता येईल, असे सरकारला वाटत असेल तर ते चूकीचे आहेत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला ठणकावले आहे. आम्ही जलयुक्त शिवारमुळे शेतकऱ्यांना कसा फायदा झाला हे दाखवून देऊ, असेही ते म्हणाले. उस्मानाबाद येथे आयोजित पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवारची चौकशी राज्य सरकारने नक्की करावी. ही कामे आम्ही मंत्रालयात बसून सह्या करून टेंडर ने दिलेली नव्हती. ६ लाख कामे पूर्ण झाली ती विकेंद्रीत होती. ती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. अनेक विभागाकडून ही कामे झाली. स्थानिक पातळीवर ही कामे केली गेली.
मला ६ लाख कामात ७०० तक्रार आल्याचे सांगितले होते. हे प्रमाण अतिशय अल्प आहे. असे असताना चौकशी लावून तोंड बंद करता येईल असे सरकारला वाटत असेल तर ते चुकीचे आहेत. वेळ पडली तर जलयुक्त शिवारचा फायदा कसा झाला हे दाखवून देऊ. यासाठी आम्ही शेतकऱ्यांना त्यांना कसा फायदा झाला हे त्यांच्या तोंडून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देऊ, असे फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, परतीच्या पावसाने महाराष्ट्रात हाहाकार माजवला. या पावसात शेतीचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते थेट बांधावर जाऊन करत आहेत. या दौऱ्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मदत देण्यावरून कलगीतुरा रंगला आहे.
काही दिवसांपूर्वी 'कॅग'च्या अहवालातून जलयुक्त शिवार योजनेवर ताशेरे ओढण्यात आले होते. या योजनेवर 9 हजार कोटी खर्च झाले. परंतु पाण्याची पातळी वाढली नाही, अशी माहिती उघड झाली. यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर फडणवीस हे टिकेचे धनी बनत होते. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.
हेही वाचा - मदत करण्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू -देवेंद्र फडणवीस
हेही वाचा - हात झटकण्यात तिनही पक्ष तरबेज! आता तरी मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवावी - फडणवीस