उस्मानाबाद - जिल्ह्यातील अणदूर येथील अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मागील आठ दिवसापूर्वी घडली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी अणदूर या गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सडकून टीका केली.
'बलात्काराच्या वाढलेल्या घटना राजश्रयाचे परिणाम'
त्या म्हणाल्या, की बलात्कार करणाऱ्यांना गृहमंत्री क्लीन चिट देत फिरत आहेत. त्यामुळे राज्यातील बलात्कार करणारे मोकळे फिरत असून या बलात्काराला सरकारचा राजाश्रय मिळत आहे. बलात्काराच्या वाढलेल्या घटना हे राजश्रयाचे परिणाम असल्याचे त्या म्हणाल्या. आपण व आपला पक्ष पीडित मुलीच्या व कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून यातील तीन आरोपींपैकी एक आरोपी अद्यापही मोकाट आहे, त्यामुळे त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी पोलीस अधीक्षक आणि नळदुर्ग पोलीस यांच्याकडे केली.
तीव्र आंदोलनाचा इशारा
सरकारने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वाघ यांनी दिला आहे. राज्य सरकारवर टीका करतांना गृहमत्र्यांना गाव गुंडांबरोबर फोटो काढायला वेळ असून पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी वेळ नाही. सरकार रक्षक नसून भक्षक असल्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.