नाशिक - दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव शिवारातील वागदर मळा येथे पूर्व वैमनस्यातून जमावाने एकाचा खून केला. शिवाजी सुखदेव पारधी (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दिंडोरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत बारा संशयितांना अटक केली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जमावाने मागील भांडणाची कुरापत काढत शिवाजी पारधी याच्या छातीत लोखंडी चॉपर खूपसल्याने व लाकडी दांडक्याने डोक्यावर मारहाण केल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा - नाशिक अँड माणिकराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस मधून हकालपट्टी
सविस्तर माहिती अशी की, नवरात्र उत्सवात देवी विसर्जनावेळी मृत शिवाजी सुखदेव पारधी हा कोचरगाव येथील देवीची मूर्ती ठेवलेली पिकअप गाडी चालवत होता. यावेळी आरोपी सोमनाथ याच्या गाडीला पिकअप गाडीचा कट लागल्यामुळे आपापसात वाद झाला होता. तेव्हापासून संशयित आरोपी सोमनाथ टोंगारे व मृत शिवाजी पारधी यांच्यामध्ये वैर निर्माण झाले.
या घटनेचा दिंडोरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर संशयित आरोपी सोमनाथ काळु टोंगारे, सागर भगवान लिलके, दीपक भगवान लिलके, उत्तम भगवान लिलके, भागवत मोतीराम लिलके, धर्मराज मोतीराम लिलके, प्रकाश मोतीराम लिलके, लालू मोतीराम लिलके, लक्ष्मण कचरू लिलके, मनोज लिलके भगवान लिलके, बाळू लिलके यांनी संगनमताने मृत शिवाजी पारधी याच्यावर हल्ला केला. यात शिवाजीच्या पोटात चॉपर खुपसला व लाकडी दांडक्याने मारहाणही केली. या मारहाणीमुळे शिवाजी पारधी यांचा जागीच मृत्यू झाला.
राजेंद्र रामदास पारधी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उमराळे बुद्रुक दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी करत आहेत.